Top News

जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी मुमक्का सुदर्शन पोलीस उपआयुक्त नागपूर शहर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुन्हे शाखा विभागातील त्यांच्या अनुभवाने ते चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश लावतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


चंद्रपूरची ओळख शांतताप्रिय जिल्हा म्हणून आहे. विविध जाती-धर्मांचे, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज पुढारी या जिल्ह्यात वास्तव्यास असले तरीही जिल्ह्यात कोणतीही जातीय किंवा राजकीय दंगल झाली नाही. असे असले तरीही मागील काही वर्षांत मात्र येथील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हत्या, चोरी, छेडछाड, जुगार, कोंबडबाजार, बलात्कार, अत्याचाराच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. यावर आळा घालण्याचे आव्हान नवे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यापुढे उभे ठाकले आहे. ही आव्हाने ते कशी पेलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पैसे कमविण्याच्या नादात अनेक युवा तरुण अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतले अन् यातूनच संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाली. शुल्लक कारणावरून, घरगुती वादातून, दारू विक्रीच्या वादातून अनेक हत्या झाल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीही सुरूच आहे. तर अनेक दारूविक्रेते घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी करीत असल्याचे काही कारवायांतून पुढे आले आहे. त्यामुळे शांततापूर्ण असलेल्या जिल्ह्याचे वातावरण गुन्हेगारीने ढवळून निघत आहे. यावर अंकुश लावण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेल्या मुमक्का सुदर्शन यांच्यापुढे आता उभे ठाकले आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात सतत हत्येच्या घटना घडत असून, आतापर्यंत नागभीड, बल्लारपूर, चंद्रपूर , ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर, चंद्रपुर, कोरपना या ठिकाणी हत्येच्या घटना घडल्या आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात 8 हत्या झाल्याच्या घटनेनं अख्य चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर, गोंडपिपरी व बल्लारपूर शहरात एकाच दिवशी तीन हत्या झाल्या. या हत्येच्या मालिकांमुळे जिल्हा हादरून गेला असून, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात हत्या, चोरी, दरोडे, दुचाकी चोरी, अवैध दारू विक्री यासह अवैध विक्रीने डोके वर काढले आहे. नव्यानेच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यापुढे या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे आव्हान आहे. ही आव्हाने ते कशी पेलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने