चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात स्थानिक उमेदवार हवा! #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
चंद्रपूर:- देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन बांधणी आणि प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जिल्हा प्रमुखांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्थानिक व्यक्तीलाच तिकीट देण्याबाबत ठराव घेण्यात आला. यावेळी सर्व पक्षातील पक्ष प्रमुखांना विनंती पत्र पाठवण्यात येणार आहे.
यावेळी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि संभाजी ब्रिगेड आदि पक्ष पदाधिकारी सहभागी झाले होते.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असताना महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळूभाऊ धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसने विजय मिळविला. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला मोठा लाभ होऊ शकतो.

बैठकीला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, शहर काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक जयस्वाल, आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता सुनील मुसळे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सोयल शेख, संभाजी बिग्रेडचे शहर अध्यक्ष विनोद थेरे उपस्थित होते.