पोलिस अधीक्षकांचा इशारा; सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर
चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन चुकीची माहिती पसरविणाऱ्या 'फेक न्यूज'वर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे फेक न्यूज शेअर केली तर पोलिस कोठडीत जावे लागेल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे.
कोणत्याही निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा प्रचारासाठी अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात येतो. बरेचदा निवडणूक काळात आरोप- प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येते. दरम्यानच्या काळात उत्साही कार्यकर्ते काहीतरी चुकीची पोस्ट टाकतात. यामुळे सामान्यांच्या भावना दुखावून वाद होण्याची शक्यता असते. परंतु, आता असे मेसेज किंवा चुकीच्या बातम्या 'फेक न्यूज' पसरविणाऱ्यांवर जिल्हा पोलिस दलासह सायबर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे एखादी चुकीची पोस्ट टाकली किंवा शेअर केली तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या तरी गुन्हा दाखल नाही
लोकसभा २०२४ च्या अनुषंगाने जिल्हा पोलिस सक्रिय झाले आहेत. आचारसंहिता सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, सध्या तरी असा कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.
असे मेसेज व्हायरल करणे धोकादायक
उपहासात्मक, दिशाभूल करणारा मजकूर, गुन्हेगारी जगताशी संबंधित कंटेट, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित खोटी माहिती देणारा मजकूर, फेक न्यूजमुळे समाजावर अनेक प्रकारे परिणाम होतात. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करणे धोकादायक असते.
फेक न्यूजसंदर्भात तक्रार कोठे कराल?
आपत्तीकारक मजकूर किवा फेक न्यूज संदर्भात तक्रार करायची असेल तर ती स्थानिक पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाणे येथे करता येते. यासोबतच ११२ वर सुद्धा तक्रार करता येते.
निवडणुकीच्या काळात विशेष लक्ष
निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, कोणत्याही प्रकारचे चुकीचे मेसेज किंवा फेक न्यूज व्हायरल होऊन सामाजिक शांतता भंग होऊ नये, यासाठी सायबर पोलिसांचे तसेच जिल्हा पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे एखादी चुकीची बातमी पसरवणे धोक्याचे ठरू शकते.
पोलिस अधीक्षक म्हणतात...
फेक न्यूज, एखादी चुकीची पोस्ट टाकणे किंवा शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कुणीही चुकीची किंवा वादग्रस्त पोस्ट टाकू नये किवा शेअर करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.
मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक