Top News

पूर्व विदर्भात काँग्रेसला भाजपचा "दे धक्का" #chandrapur #gadchiroli


कोडवते, उसेंडी पाठोपाठ देवतळेंचा भाजपात प्रवेश

चंद्रपूर:- पूर्व विदर्भात काँग्रेसला तीन मोठे धक्के बसले आहे. आतापर्यंत विदर्भातील काँग्रेसचे तीन मोठे नेते भाजपात प्रवेश केल्याने भाजपने काँग्रेसला "दे धक्का" दिला आहे. येत्या काही दिवसात पुन्हा काही काँग्रेसच्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते यांनी आज मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. कोडवते दांपत्य हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया उपस्थित होते.


माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या २२ जिल्ह्यांतील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा त्यांनी दावा केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, आमदार बंटी भांगडिया उपस्थित होते.

पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिशाहिन प्रदेश नेतृत्त्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. देवतळे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजप प्रवेश केला आहे. प्रकाश देवतळे यांनी सुधीर मुनगंटीवार व आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने