
गडचिरोली:- जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे मोठ्यासंख्येने पक्षप्रवेश होताना दिसतायेत. दरम्यान गडचिरोलीमध्ये काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. लोकसभा जागा वाटपात काँग्रेसचे किरपान यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज असलेल्या नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि बंटी भांगडिया यांच्या शिष्टाईला यश आल्याची चर्चा आहे.
काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत आहेत. काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत होतो. नेमणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी काँग्रेस पक्षाच्या संघटनाचं काम केलं. काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे गडचिरोली - चिमुर या लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती. स्थानिक व राज्य पातळीवरचं माझं काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक व राज्य पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिल्यांची खंत नामदेव उसंडी यांनी व्यक्त केली.