ज्यांनी लोकशाहीची हत्या केली, ते संविधानाबद्दल गळे काढतात! #Chandrapurloksabha #chandrapur

Bhairav Diwase
‘लाईव्ह’ मुलाखतीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

चंद्रपूर:- भाजपा संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षातील लोक करतात. हे अत्यंत हास्यास्पद आहे. कारण ज्या लोकांनी वारंवार लोकशाहीची हत्या केली, तेच आज संविधानाबद्दल गळे काढत आहेत, या शब्दांत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
एका वाहिनीच्या ‘लाईव्ह’ मुलाखतीत ना. श्री. मुनगंटीवार यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, ‘जोसेफ गोबेल्स नावाचा माणूस खोटं बोलण्यात पटाईत होता. त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहिले होते की, कुठलीही खोटी गोष्ट खरी वाटायची असेल तर तीनवेळा तेच तेच खोटे बोलले पाहिजे. काँग्रेसचे लोक गोबेल्सचे पट्टशिष्य आहेत. आम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न करतोय असा अपप्रचार करतात, आम्ही संसदीय लोकशाही संपुष्टात आणू असे सांगतात. पण आणीबाणी लावून त्यांनीच लोकशाहीची हत्या केली, संविधानाची पायमल्ली केली, शिखांची दंगल घडवली. त्या काँग्रेस आणि मित्र पक्षांनाच संविधान समजले नाही.’ विकासावर भाषण करता येत नाही म्हणून विरोधक खालच्या भाषेचा आधार घेतात, असाही आरोप त्यांनी केला.

‘विकासाचे राजकारण करणाऱ्यांच्या पाठिशी जनता उभी राहत असते, हे आपण सलग दहा वर्षे बघतोय. दुर्दैवाने विरोधकांना असे वाटते की निवडणुका विकासकामांवर होत नाहीत. ते बुद्धीचा वापर कमी करतात. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काहीच जमले नाही की आपले अपयश ईव्हीएमवर आणून टाकतात,’ अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींना तर पंतप्रधान श्री. मोदीजींवर आणि भाजपवर टीका करण्याचा अधिकारच नाही. कारण मोदीजींनी देशासाठी परिवाराचा त्याग केला आणि त्यांच्या काँग्रेसने परिवारासाठी देशाचा त्याग केला. राहुल गांधी पत्रकारांना जात विचारतात आणि तिकडे भारत जोडो यात्रा करतात. मोदी सरकारचा विकासाचा झंझावात बघून विरोधक बावचळले आहेत, त्यामुळे त्यांची ही गत झाली आहे, या शब्दांत ना. श्री. मुनगंटीवार यांनी समाचार घेतला.
‘महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध’

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडीचे नेते कायमच विरोधात राहिले. शरद पवार साहेब मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असे म्हणायचे. अशा लोकांसोबत महाराष्ट्राची जनता उभी राहणार नाही. ही जनता संवेदनशील महायुती सरकारच्याच बाजुने उभी राहील, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी मुलाखतीत व्यक्त केला.