Suicide: घरच्यांशी नंतर बोल म्हणताच वाद; पत्नीने घेतला गळफास! #Chandrapur

Bhairav Diwase
0
माजरी:- कुचना येथील वेकोलि वसाहतीत राहणाऱ्या माजरी क्षेत्र मुख्यालयातील सहायक प्रबंधकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी (दि. २९) दुपारी घडली. अन्नू राहुल शाहू (३२) असे मृत महिलेचे नाव आहे.

वेकोलिच्या वित्तविभागातील सहायक प्रबंधक राहुल शाहू हे कुचना कॉप्लेक्समधील बी ११ क्रमांकाच्या वसाहतीत पत्नी अन्नू सोबत राहत होते. होळीनिमित्त ते मूळगावी दिल्ली येथे गेले होते. गुरुवारी दुपारी २ वाजता दोघेही पती-पत्नी आपल्या घरी आले. त्यानंतर, पती राहुल हे साफसफाई करत असताना पत्नी अन्नू ही आपल्या घरच्यांशी फोनवर बोलत बसली. कामे लवकर आटोपून स्वयंपाक कर आणि त्यानंतर घरच्यांशी बोल, असे बोलून पतीने मोबाइल हिसकावला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी बेडरूममध्ये निघून गेली. काही वेळाने राग शांत होईल, असे समजून पती बाजूच्या खोलीत पेपर वाचत बसला.

मात्र, बराच वेळ होऊनही पत्नी बाहेर आली नाही. दार आतून बंद होते. दार ठोठावूनही बोलत नसल्याने पतीने बाहेरून खिडकीतून डोकावून बघितले असता, पत्नी पंख्याला गळफास लावलेली दिसली. त्याने शेजारील कुटुंबांच्या मदतीने दार तोडले आणि लगेच स्वतःच्या कारने वेकोलि माजरी क्षेत्र एरिया हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली.
#साभार

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)