चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी विदर्भातील सहा मतदारसंघात निवडणूक होत असून, काँग्रेसने 4 नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. मविआत चंद्रपूर लोकसभेची अद्याप घोषणा व्हायची असली तरी चंद्रपूरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवारी उशिरा काँग्रेसने यादीत विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र सर्वाधिक चर्चेत आणि जातीय समीकरण, पत्रकबाजीत वादात सापडलेली चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. अखेरच्या टप्प्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे तिकीट जवळपास फायनल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर व ब्रह्मपुरीचे आमदार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यासाठी, वडेट्टीवार यांना विरोधासाठी काँग्रेसचे दोन्ही गट उघडपणे रस्त्यावर आले. शिवानी वडेट्टीवार यांच्याऐवजी तुम्ही लढावे असे हायकमांडने सांगितल्याने वडेट्टीवार यांना तयार व्हावे लागणार आहे. मात्र, धानोरकर गटाला कामाला लावण्यात त्यांना कितपत यश येते यावर मुनगंटीवार-वडेट्टीवार लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.