Amit Shah's Edited Video Case: अमित शाहच्या फेक व्हिडिओ प्रकरणी रेवंत रेड्डी यांना समन्स #chandrapur #fakevideo

Bhairav Diwase
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बनावट व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांना समन्स बजावले (Revanth Reddy Summoned) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रेवंत रेड्डी यांना 1 मे रोजी त्याच्या वापरलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससह चौकशीसाठी बोलावले आहे.


बनावट व्हिडिओ शेअर करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह आणखी पाच जणांनाही दिल्ली पोलिस समन्स बजावणार आहेत. गृहमंत्रालय आणि भाजपच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी एक दिवसापूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज रेड्डी यांना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावलं आहे.

स्पेशल सेलने भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांनुसार आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे. काही मॉर्फ केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर 'समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शेअर केले जात आहेत, ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे' असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी सोमवारी एकाला अटक करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, आसाम पोलिसांनी रितोम सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने अमित शाह यांचा आरक्षणासंदर्भात तयार केलेला एडिटेल (फेक) व्हिडिओ शेअर केला होता.