Top News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतररही जिवती तालुका लालपरी च्या प्रतीक्षेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतररही जिवती तालुका लालपरी च्या प्रतीक्षेत.

एक हप्त्यात बस सुरू न केल्यास विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर विद्यार्थी संघटनेचे देविदास खंदारे व प्रविन मेकर्तीवार आंदोलन करून उपोषणाला बसणार..!


राजुरा : भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले असून अमृत महोत्सव सर्वांनी साजरा केला परंतु आज सुद्धा जिवती तालुक्यात महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणारी एस टी सर्वसामान्यांची लालपरी जिवती तालुक्यात पोहचली नाही.जिवती तालुका अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल क्षेत्र असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाची सोयी खूप गरजेच्या आहे, दळणवळणाच्या दृष्टीने प्रत्येक गाव-खेड्यातील नागरिकांना सोयीसुविधा मिळणे अपेक्षित असताना आजही अनेक गावांत परिवहन मंडळाची लालपरी पोहोचली नाही. फक्त ठराविक गावालाच लालपरीचे दर्शन झाले. ज्या गावात बसेस चालू आहेत, त्या संपूर्ण भंगार आणि खिळखिळ्या झालेल्या आहेत. असे असतानाही प्रवासी शासनाची बस म्हणून जीव धोक्यात घालून या बसने प्रवास करीत आहेत. निवडणुकीचे कारण पुढे करून रविवारी गडचांदूरवरून जिवतीकडील गावांना जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील बसफेऱ्या बंद केल्याने अनेकांना गडचांदुरातच मुक्काम ठोकण्याची पाळी आली. आजही या दोन्ही मार्गावरील बसफेऱ्या बंदच असल्याची माहिती राजुरा आगारातून मिळाली असून प्रवाशांना त्रास भोगावा लागत आहे.
 
जिवतीला तालुक्याचा दर्जा मिळाला. परंतु तालुक्याच्या मानाने आजही विकास झालेला नाही. सोयीसुविधांसह दळणवळणाच्या सोयी पोहोचल्या नाहीत. ज्या गावात लालपरी पोहोचली, तीही भंगार स्वरूपातील खिळखिळी झालेली आहे. अशाच बसमधून नागरिक प्रवास करतात. गडचांदूरवरून जिवती प्रवासाचा मार्ग घाटाचा व वळणदार रस्त्याचा आहे. भंगार व खिळखिळी बस घाटावरून चढत नाही. रस्त्यात कुठेही बंद पडते. कधीकधी तर घाटाच्या रस्त्यात ब्रेक लागत नाही व गिअर पडत नाही. त्यामुळे अनेकदा या घाटात बसचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी अनेक प्रवासी जखमीही झाले आहे. अशा विविध घटना डोळ्यासमोर असतानाही जिवतीतील नागरिकांच्या मस्तकी भंगार व खिळखिळ्या बस मारून दळणवळणाचे कार्य निभावत असले तरी त्याचा परिणाम वाहनचालक, वाहकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. शहरी भागाच्या तुलनेत जिवती तालुक्याचा विकास झालेला दिसत नाही. शासन, प्रशासनाकडून विकासाच्या दृष्टीने होणारे प्रयत्न अपुरे आहेत. आजही अशा कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत. आहे त्या गावातीलही दळणवळणाच्या सोयी बंद करून नागरिकांना अडचणीत आणले जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने