
पुणे:- प्रवेश शुल्क स्वीकारल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र बंद केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र चालकासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी 'थिंक ॲण्ड लर्न कोचिंग क्लास'चे संचालक सैफ अली शेख (वय ३२, रा. बीड), व्यवस्थापक गोविंद राठोड (वय ३०, रा. मध्यप्रदेश) यांच्यावर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थी हा राजगुरुनगर परिसरात राहायला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याने थिंक ॲण्ड लर्न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेतला. त्याने वर्षभरासाठी ५६ हजार शुल्क भरले. तसेच मार्गदर्शन केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबतची माहिती घेतली.
शुल्क भरल्यानंतर तीन महिने मार्गदर्शन केंद्र सुरू राहिले. शैक्षणिक सुविधा दिल्या नाहीत म्हणून विचारणा केली असता तक्रारदार तरुणाला शिवीगाळ करण्यात आली. त्याने चौकशी केल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. स्पर्धा परीक्षा केंद्र चालकाने काही विद्यार्थ्यांची तीन लाख ५१ हजारांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शामने तपास करत आहेत.