नांदेड:- कंधार तालुक्यातील कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उध्दव केंद्रे ( वय २४) व पत्नी कोमल नामदेव केंद्रे (वय १९) या नवविवाहित दाम्पत्याने अवघ्या दोनच महिन्यांच्या सहजीवनानंतर स्वतःच्या शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी (दि.२३) रात्री घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे कळकावाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, जुन्ने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
या नवविवाहितांचा गेल्या दोन महिन्यापूर्वी दि.१७ फेब्रुवारीरोजी कळकावाडी येथे झाला होता. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत नामदेवचे वडील उद्धव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे करत आहेत.