नवी दिल्ली:- बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप यांनी २५ एप्रिल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनीष कश्यप यांनी दिल्लीला जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला.पक्ष प्रवेशानंतर मनीष कश्यप म्हणाले की, कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही तर माझ्या आईच्या सांगण्यावरून मी पक्षात सामील झालो आहे.माझी आई पंतप्रधान मोदींची मोठी चाहती असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनीष यांच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांच्या आई देखील उपस्थित होत्या.भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मनीष कश्यप म्हणाले की, मी तुरुंगात होतो तेव्हा माझ्यासाठी लढत होती.त्यावेळी निवडक लोकांनी माझ्या आईला पाठिंबा दिला, यामध्ये मनोज तिवारी, सुशील मोदी, विनोद तावडे आणि विजय सिन्हा या भाजप नेत्यांचा समावेश होता.मनोज तिवारींनी माझ्या आईला फोन करून मनीष कश्यपला पक्षामध्ये सामील करायचे आहे असे म्हणताच माझी आई नकार देऊ शकली नाही, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्यात माझ्या आईची मोठी भूमिका आहे.पंतप्रधान मोदींची ती मोठी चाहती असून त्यांची अनेक भाषणे ऐकते.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याचे आदेश मला माझ्या आईने दिल्याचे त्यांनी सांगितले.आईच्या विनंती वरूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला, असे मनीष कश्यप म्हणाले.