मुख्याध्यापिका, शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकासह या प्रकरणाची माहिती असूनही पोलिसांना किंवा कुटुंबास माहिती न दिल्याने मुख्याध्यापिकेवरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची घटना गुरुवारी चंद्रपूर तालुक्यातील एका जि.प. शाळेत उघडकीस आली.

इंद्रजित रायपुरे (५७), असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इंद्रजित रायपुरे या शिक्षकाने २२ एप्रिल रोजी शाळेतील दोन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती एका पीडित मुलीने मुख्याध्यापिकेस त्याच दिवशी दिली. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान, दोन दिवसांनंतर पीडित एका मुलीने याबाबतची माहिती आपल्या आईला दिली. त्यांनी लगेच दुर्गापूर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची रीतसर तक्रार दिली. तेव्हा पुन्हा एका मुलीशी असाच प्रकार घडल्याचे तपासात समोर आले. त्या आधारावर दुर्गापूर पोलिसांनी इंद्रजित रायपुरे या शिक्षकावर कलम ३५४ (अ) (१), पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली, तसेच याबाबतची माहिती असूनही वरिष्ठ अधिकारी, पीडितेचे पालक किंवा पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे मुख्याध्यापिकेवर कलम २१ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दुर्गापूरच्या ठाणेदार लता वाडिवे यांनी दिली.