चंद्रपूर:- अयोध्येत श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या पृष्ठभूमीवर यावर्षीचा श्रीरामजन्मोत्सव भव्य दिव्य करण्याचा संकल्प असून, त्या अनुषंगाने यावर्षी गुढीपाडवा ते श्रीरामनवमीपर्यंत नऊ दिवस महानगरातील प्रत्येक चौकात स्थायी देखावे, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, अशी माहिती श्रीराम जन्मोत्सव शोभयात्रा समितीच्या पदाधिकार्यांनी दिली.
श्रीराम जन्मोत्सव शोभयात्रा समितीची नियोजन बैठक 27 मार्च रोजी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक भागवताचार्य मनिष महाराज, रामजन्मोत्सव शोभयात्रा समितीचे अध्यक्ष शैलेश बागला, समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, समितीचे सहसचिव विजय येंगलवार, राष्ट्र स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, विंहिपचे महानगर अध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
यावर्षी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यत नऊ दिवस महानगरातील प्रत्येक मंदिर, चौक व घरोघरी भगवे झेंडे लावण्यात येईल. विविध संस्था व समाजाच्या सहयोगातून सर्व देवस्थान व प्रमुख चौकांमध्ये सुंदरकांड पाठ, श्री रामलला जन्मस्थान मंदिर, श्री काशी विश्वनाथ मंदिर, श्रीकृष्ण जन्मस्थान मथुरा, योगनृत्य, मल्लखाम, गौमाता आदी स्थिर देखावे साकारण्यात येईल. मंदिरात भजन, पूजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. श्रीरामनवमीनिमित्त 17 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता पठाणपूरा परिसरातील काळाराम मंदिर येथे विधीवत पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ होईल. यावर्षी शोभायात्रेत व्यापारी व विविध संस्था, संघटनाच्या सहभागातून 111 स्वागतद्वार व महाप्रसाद वितरणाचे अनेक स्टॉल लावण्यात येणार आहे. तसेच अधिकाधिक देखावे यंदाच्या शोभयात्रेचे विशेष आकर्षण राहील.
यासोबतच ध्वज, अश्व, स्वागत फलक, दवंडी रथ, बँड, लेझिम, नारी शक्तीद्वारे कलश यात्रा, बंगाली कॅम्प भगीनींद्वारा शंखनाद, श्रीरामाची पालखी, भजन मंडळ आदींचा समावेश राहील. प्रत्येक समाजातील बंधू, भगिनी, युवती, युवक आपल्या पारंपारिक गणवेशात शोभायात्रेत सहभागी होतील. श्रीरामाची महाआरती मंच ध्वनी प्रणाली व यंत्रासह करण्यात येईल, अशी माहिती समितीच्या पदाधिकार्यांनी दिली. यावेळी श्रीरामजन्मोत्सवात सक्रीय सहभाग घेणार्या रामभक्तांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक विहिंपचे विदर्भ प्रांत सत्संग प्रमुख राकेश त्रीपाठी यांनी केले. बैठकीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध समाजिक व धार्मिक संस्था, गणेश व दुर्गा मंडळाचे प्रतिनिधी, महानगरातील व्यापारी बांधव व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.