Top News

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला आजीवन कारावास #pombhurna #chandrapur #murder


एप्रिल २०२१ साली सासऱ्यानेच केला होता सुनेचा खुन
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील चेक नवेगांव येथील गुन्हेगार सासरा भुजंग झिटू कन्नाके (५७) याला चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. काळे यांच्या न्यायालयाने दिनांक ३० मार्च रोजी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली असून सोबतच ५००/- रूपयाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिण्याची शिक्षा असे देण्यात आलेल्या शिक्षेचे स्वरूप आहे.


दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी पोंभूर्णा तालुक्यातील चेक नवेगांव गावात सासऱ्याकडूनच सुनेचा खुन झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. कौटुंबिक किरकोळ शाब्दिक भांडणाचे पर्यावसान मारहाणीत झाल्याने सुनेला आपला जीव गमवावा लागला होता. गिता दिपक कन्नाके (३२) असे मृतक महिलेचे नाव आहे. अंगणात खुनी सासरा व त्याच्या काहीच फुट अंतरावर मृतक गिता बसली होती. घरेलु शुल्लक कारणावरून सासरा भुजंग व गिता मध्ये शाब्दिक भांडण सुरू झाले होते. राग अनावर होऊन भुजंगने दगडी फरशीच्या तुकड्याने गिताच्या डोक्यावर व मानेवर वार केले, दवाखान्यात नेत असतांना रस्त्यातच तिचा मृत्यु झाला होता.


पोंभूर्णा पोलीसांनी आरोपी भुजंग विरूद्ध अपराध क्रमांक ३७/२०२१,भादंवि कलम -३०२,नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तत्कालीन ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ओलालवार यांनी तपास करून प्रकरण न्यायालयात पाठविले होते.

याच खुन प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश काळे यांनी दिनांक ३० मार्च २०२४ रोजी आरोपीला गुन्हेगार ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा व ५००/- रूपयाचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिण्याची शिक्षा असा निकाल दिला आहे. सरकारच्या बाजूने सरकारी वकील सिमा रामटेके यांनी पैरवीचे काम पाहीले,तर पैरवी अधिकारी म्हणून पोंभूर्णा पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार सुधाकर तोडासे न्यायालयात उपस्थित राहीले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने