प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग #chandrapur #Bhandara

Bhairav Diwase

भंडारा:- अश्लील चाळे करून एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला लोकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिस कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती होताच संस्थेने त्याला नोकरीतून बडतर्फ केल्याची घटना येथे घडली आहे. आरोपीचे नाव डॉ. पी. एस. रघू असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असलेला डॉ. पी. एस. रघू हा पंचशील वाॅर्डात भाड्याने राहतो. राष्ट्रीय महामार्गालगत स्टे ईन हाॅटेल समोर असलेल्या बगीचा सायंकाळी मुले खेळतात. बुधवारी सायंकाळी तेथे खेळण्यास आलेल्या एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलवून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करत बॅड टच केला. त्यामुळे मुलगी घाबरून रडत घरी गेली. तिने आईला झालेला प्रकार सांगितला.

तोपर्यंत बगीचात आलेल्या युवकांनाही हा प्रकार माहित झाल्याने संतप्त युवकांनी या प्राचार्याला घराबाहेर काढून त्याचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना बोलवून आरोपी प्राचार्य रघू याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी डॉ. रघू याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्राचार्याचे गैरवर्तन लक्षात घेऊन कॉलेज व्यवस्थापनाने रात्रीच त्याला नोकरीतून बडतर्फ केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमित्रा साखरकर करीत आहेत.