चंद्रपूर:- महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलांतर्गत असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणने नागरिकांना मोबाईलद्वारे व्हॉटस्पॲपवरचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी याबाबत आवाहन केले असून व्हॉटस्पॲपवर द्वारे प्राप्त झालेल्या फोटो माहिती / तक्रारींनुसार वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी, व केलेल्या कार्यवाही विषयी संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी महावितरणच्या सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना दिले आहेत.
चंद्रपूर परिमंडलांतर्गत असलेल्या चंद्रपूर मंडलातील चंद्रपूर, भद्रावती, बल्लारशा, वरोरा, चिमुर, सिंदेवाही, मुल, सावली, गोंडपिपरी, कोरपना, पोंभूर्णा, राजुरा, आणि जिवती या तालुक्यांसाठी मंडलासाठी ७८७५७६११९५ तसेच गडचिरोली मंडल अंतर्गत गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, कोरची, भामरागड आणि ब्रम्हपुरी या तालुक्यांसाठी ७८७५००९३३८ हा व्हॉटस्पॲपवर मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी कॉल करू नये. फक्त व्हॉटस्पॲपवर द्वारे माहिती द्यावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस्पॲपवर नाहीत त्यांनी एसएमएस द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
महावितरणची वीजतार तुटलेली आहे, झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे तसेच रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे अशाच स्वरुपाची माहिती / तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून व शक्य असल्यास स्थळाच्या लोकेशनसह नागरिकांनी व्हॉटस्पॲपवर च्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येणार आहे. यासोबतच अशा स्वरुपाच्या तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली सेवा उपलब्ध राहील.
व्हॉटस्पॲपवर द्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. तक्रारीनुसार वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस्पॲपवर द्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे.
नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन वीजसुरक्षेसाठी वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.