बनावट बियाणे आणि लाखो रुपये यांच्या मुद्देमालासह एकास अटक #chandrapur #yawatmal

Bhairav Diwase
यवतमाळ:- यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे बनावट बीटी कपाशीच्या बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर या माहितीच्या आधारे कृषी विभागाने सापळा रचत बियाणे जप्त केली आहेत.

यात सुमारे १ लाख रुपयांहून अधिक रुपयांचे बोगस बियाणे जप्त केली आहेत. कृषी विभागाची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. यामध्ये ७८ बोगस बियाण्यांची पाकिटे जप्त केली असून मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी विलास चिकटे (रा. चिंचाळा) याला अटक केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या बोगस बियाणांच्या पाकिटांवर ८६३ रुपये किंमत लिहिली असल्याने या किंमतीनुसार त्यांची एकूण किंमत ही १ लाख १ सहस्र रुपये आहे. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पोलीस सध्या पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. जिल्ह्यातील तेलंगाणा आणि गुजरात या परराज्यांतून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विनापरवाना विक्रीसाठी बनावट बियाणे येत असतात. याला अटकाव घालण्यासाठी कृषी विभागाकडून १७ 'भरारी पथके' स्थापन करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.