गडचिरोली:- जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन एक महिला आणि पुरुषाला जिवंत जाळल्याच्या घटनेआधी एटापल्ली तालुक्यात अशीच आणखी एक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी वृद्धाला बेदम मारहाण करुन तप्त सळईचे चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
२९ एप्रिल रोजी जांभिया (गट्टा) येथे घडलेल्या या घटनेतील पीडित इसमाचे नाव दलसू मुक्का पुंगाटी (वय ६०) असे आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राजू जोई (६०), झुरु पुंगाटी (५४), बाजू जोई (५५), रेणू पुंगाटी (५०), मैनू जोई (३९), शंकर जोई (३१), दिनकर जोई (२६) व विजू होळी (सर्व रा. जांभिया) या आठ जणांना अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दलसू पुंगाटी हा जादुटोणा करतो, अशा संशयावरुन गावातील काही नागरिकांनी २९ एप्रिलच्या रात्री त्याला एका समाजमंदिराजवळ नेले. तेथील मंडपात दलसूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्याच्या अंगावर तप्त लोखंडी सळईचे चटकेही दिले. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाने बघितल्यानंतर त्याने गट्टा पोलिस ठाण्यात या विषयी माहिती दिली. दुसऱ्या दिवशी ३० एप्रिलला पोलिसांनी जांभिया येथे जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी दलसू पुंगाटी यास एटापल्ली येथील ग्रामीण रुगणालयात दाखल केले.
पुंगाटी यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राजू जोई, झुरु पुंगाटी, बाजू जोई, रेणू पुंगाटी, मैनू जोई, शंकर जोई, दिनकर जोई व विजू होळी यांना अटक केली.