घरमालकाची भाडेकरुने केली हत्या, आरोपीस अटक #Mumbai #murder

मुंबई:- गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून हत्येसारख्या घटना घडत आहेत. आता पुन्हा मुंबई उपनगरातील गोवंडी येथे विद्युत बिलाच्या वादातून घरमालकाची भाडेकरुने मारहाण करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.



गोवंडीतील देवनार परिसरात ही घटना घडली असून गणपती शारदानंद झा (वय वर्ष 49) असे हत्या करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे. या प्रकरणी अब्दुल सुभान मेनामुल्ला शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा रहिवाशी असलेला गणपती हा गोवंडीतील बैंगणवाडी, गणेश हॉलजवळील संजयनगर परिसरात राहत होता. त्याच्या पत्नीचे निधन झाले असून दोन्ही मुलींचे लग्न झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला होता, त्यामुळे तो चालताना लंगडत होता. त्याच्याकडे अब्दुल हा भाडेकरु म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात लाईट बिलवरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने गणपतीला लाकडी दांडा आणि लोखंडी हातोड्याने बेदम मारहाण केली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांसमोर झाला होता.


परंतु, तीन दिवसांपूर्वी गणपतीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या घरातून दुर्गधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता गणपती हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.



हत्येच्या तीन दिवसांनंतर ही घटना समोर आल्यामुळे तोपर्यंत हा मृतदेह फुगला होता. तसेच त्याच्या तोंडातून आणि नाकातून लाल रंगाचे द्रव्य बाहेर येत होते. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर गणपती शारदानंद झा याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. तर पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता हा हत्येचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी अब्दुलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी आरोपी अब्दुल याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या