पोलीस भरतीत 7 जणांना उलट्या; एकाचा मृत्यू, एक व्हेंटिलेटरवर #Mumbai #Maharashtra #death

Bhairav Diwase

मुंबई:- पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेले सात उमेदवार धावत असतानाच मैदानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानी चाचणी सुरू असताना सर्वांना उलटय़ांचा त्रास सुरू झाला.

त्यांना तत्काळ सातही जणांना कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील अक्षय बिऱ्हाडे (25) याचा मृत्यू झाला, तर प्रेम ठाकरे (29) याची प्रकृती अत्यवस्थ असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित पाच जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेमागचे कारण स्पष्ट होणार आहे.

राज्य राखीव पोलीस दलाच्या शिळफाटय़ावरील बाळेगाव एसआरपीएफ कॅम्पमधील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठय़ा संख्येने इच्छुक उमेदवार येथे दाखल झाले आहेत. शनिवारी पहाटे 4 वाजता मैदानी चाचणी होती. त्याकरिता अक्षय बिऱ्हाडे, प्रेम ठाकरे, पवन शिंदे (25), अभिषेक शेटये (24), सुमित आडतकर (23), साहील लवण (19) अशा सात जणांना धावत असताना अचानक उलटय़ांचा त्रास होऊ लागला. पाहता पाहता सर्वजण मैदानात कोसळले. हा प्रकार लक्षात येताच अधिकाऱ्यांनी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बोराटे यांनी अक्षय याला मृत घोषित केले, तर धुळे येथील प्रेम ठाकरे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.