'सूर्या'ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला! #T20WORLDCUPWINNER

Bhairav Diwase
मुंबई:- अखेरच्या षटकात अर्थात सहा चेंडूंत दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. हार्दिक पंड्याच्या त्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ९ धावा करता आल्या आणि ७ धावांनी भारताने टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. २००७मध्ये भारताने पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विजेतेपद पटकाविले होते. त्यावेळी त्या संघाचा एक भाग राहिलेल्या रोहित शर्माने यावेळी आपल्या कर्णधारपदाखाली विजेतेपद मिळवून दिले. भारताचे हे दुसरे टी-२० वर्ल्डकप विजेतेपद ठरला.
पाच चेंडूंत १६ धावांची आवश्यकता होती. रबाडाने हार्दिकला फटका लगावला आणि त्याच्या बॅटची कड घेत चेंडू थर्ड मॅनला चौकार गेला. दक्षिण आफ्रिकेला ४ चेंडूंत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर बाय धाव मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेला ३ चेंडूंत ११ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर लेगबाय मिळाला आणि २ चेंडूंत १० धावा हव्या होत्या. पाचवा चेंडू मात्र वाईड पडला. दक्षिण आफ्रिकेच्या थोड्या आशा जागृत झाल्या. पाचव्या चेंडूवर रबाडा झेलचीत झाला. हा झेलही सूर्याने पकडला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर ९ धावांची आवश्यकता असताना नॉर्थेने एक धावा काढली आणि वर्ल्डकप विजेतेपदावर भारताने शिक्कामोर्तब केले.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेल्या आणि अपयशामुळे टीकेचा धनी ठरलेल्या हार्दिकने यावेळी मात्र कमाल करून दाखविली. त्याने या षटकात ९ धावा दिल्या आणि भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या विजयानंतर त्याने अश्रुंना वाट मोकळी करून दिली. तिकडे कर्णधार रोहित शर्मादेखील आपले आनंदाश्रु लपवू शकला नाही. प्रशिक्षक म्हणून अखेरची स्पर्धा खेळत असलेल्या राहुल द्रविडचा आनंदही गगनात मावेनासा झाला. सगळ्या सपोर्ट स्टाफसह त्याने हा आनंद साजरा केला. विराटवरही सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्याची ७६ धावांची खेळी महत्त्वाची ठरली.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला पण विराटने २ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने ७६ धावांची खेळी करत भारताला ७ बाद १७६ धावांपर्यंत नेले. अक्षर पटेलने ४७ धावांची खेळी केली तर शिवम दुबेने २७ धावा केल्या.

१७७ धावांचे लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेला १२ धावांत २ धक्के बसले पण नंतर क्विन्टन डीकॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी ५८ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. क्लासेनने ५२ धावा करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. पण पंड्याने क्लासेनचा खेळ संपुष्टात आणला आणि नंतर त्यानेच अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेकडून सामना खेचून घेतला. त्याने ३ षटकांत २० धावा देत ३ बळी घेतले. बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी २ बळी घेतले.