नाशिक:- पोलीस भरतीसाठी घरातून दुचाकीस्वार निघालेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला. ग्राऊंड पासून काही अंतरावरच भरधाव आयशर या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने हा २२ वर्षीय युवक ठार झाला. हा अपघात नांदूरनाका भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Also Read:- चंद्रपूर पोलीस भरतीत बेरोजगारीचे संकट गडद!
कुणाल रामदास चरमळ (रा.करंजी ता.कोपरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. चरमळ या युवकाने शहर पोलीस दलातील शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यास सोमवारी (दि.२४) पहाटे ग्राऊंडच्या चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने तो मध्यरात्री करंजी येथून आपल्या दुचाकीवर नाशिकच्या दिशेने निघाला होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास सिन्नर शिर्डी रोडने वावी मार्गे तो शहरात दाखल झाला होता. मिनाताई स्टेडिअमच्या दिशेने मार्गस्थ होत असतांना हा अपघात झाला.
या अपघातात कुणाल चरमळ गंभीर जखमी झाल्याने त्यास मित्र धिरज गायकवाड याने तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. पोलीस भरतीच्या चाचणीसाठी निघालेल्या तरूणावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत.