दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तीन दरोडेखोरांना अटक Chamorshi gadchiroli chandrapur

Bhairav Diwase
चामोर्शी:- सराफ व्यवसायिकांची रेकी करून त्यांना लुटण्याच्या हेतूने चारचाकी वाहनातून चामोर्शीत आलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिसांनी गुरूवारी (दि.३०) मध्यरात्री केली.

सरताज खान इजहार खान (वय ३५, रा.रामाळा तलाव, बगल खिडकी, चंद्रपूर) अमन अक्रम खान (वय २२, रा.रामटेकेवाडी, ताडबन वॉर्ड क्रमांक २, शाईचौक चंद्रपूर) व गुलाम अहमद रजब अली (वय ३२ रा. राजूर कॉलनी, वणी, जि.यवतमाळ) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत.

चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ काही इसम संशयितरित्या फिरताना दिसले. नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांना माहिती दिली. एवढ्यात संशयितांसोबत आलेले अन्य दोन सहकारी चारचाकी वाहनाने पळून गेले. पोलिस निरीक्षक विश्वास पुल्लरवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपींची झडती घेतली असता सरताज खान याच्याकडे एक देशी कट्टा व एक जीवंत काडतूस आढळून आले. अमन खानकडे धारदार चाकू, तर गुलाम अहमद अलीकडे मिरची पावडरची पूड आढळली. शहरातील सोने-चांदीचे दुकानदार रात्री दुकान बंद करुन सोबत पैशाची बॅग घेऊन जात असतात. त्यांना लुटण्यासाठी आम्ही पाच जण कारने आलो होतो. याबाबत तिघे रेकी करत होते, तर दोघे जण कारमध्ये बसले होते. अशी माहिती या संशयित आरोपींनी पोलिसांना दिली.

🌄
पोलिसांनी तिघांना भादंवि कलम ३९९ अन्वये अटक केली असून दोन फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल व उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास पुल्लरवार, उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, दुर्योधन राठोड, राधा शिंदे, हवालदार राजेश गणवीर, व्यंकटेश येल्लला यांनी ही कारवाई केली.