चंद्रपूर:- ताडोबा पर्यटनानंतर कारने चंद्रपूरकडे परत येत असताना भरधाव कार धडकेत जखमी झालेल्या चंद्रपुरातील डॉ. प्रीतेश गौरकर (३४) यांचा सोमवारी (दि. २४) उपचारादरम्यान आठव्या दिवशी नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने चंद्रपुरातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. जखमी झालेले चार डॉक्टर नागपुरात उपचार घेत असल्याचे शेगाव पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
चंद्रपुरातील डॉ. हर्षद महाले, डॉ. प्रीतेश गौरकर, डॉ. योगेंद्र नागरकर, डॉ. अशपाक शेख, डॉ. मोहम्मद शेख हे पाच तरुण डॉक्टर एम. एच. ३४ बी. आर. ६३१३ क्रमांकाच्या कारने १६ जून वरोरा-चिमूर मार्गे ताडोबाला गेले होते. डॉ. हर्षल महाले हे कार चालवत होते. पर्यटनानंतर सायंकाळी याच मार्गाने चंद्रपूरकडे निघाले. या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे डॉ. हर्षल महाले यांनी वाहनाचा वेग कमी केला. त्यादरम्यान मागून येणाऱ्या एम. एच. ०२९२९० क्रमांकाच्या कारने डॉक्टरांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत डॉ. प्रीतेश गौरकार, डॉ. योगेंद्र नागरकर, डॉ. अशपाक शेख, डॉ. हर्षल महाले, डॉ. मोहम्मद शेख हे गंभीर जखमी झाले होते.
नागरिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावली. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. प्रीतेश गौरकर यांना जबर मार लागल्याने नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 24 जूनला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. महाले, डॉ. नागरकर, डॉ. शेख, डॉ. शेख हे नागपुरात उपचार घेत आहेत. शेगाव पोलिसांनी कारचालक लंकेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा केला. पुढील तपास शेगावचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश आखाडे करीत आहेत.