गडचिरोली:- सुमारे ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी सुपारी देऊन वृध्द सासऱ्यांची थंड डोक्याने हत्या केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली येथील नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिला ६ जून रोजी नागपूरात अटक झाली.
या महिला अधिकाऱ्याची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त असल्याची माहिती आता उजेडात आली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापायी सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने सासऱ्यांना संपविल्याच्या घटनेने प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे.
पुट्टेवार परिवारात तब्बल ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद सुरू होता. २२ मे रोजी नागपुरात मानेवाडा चौकालगत कारच्या धडकेने पुरुषोत्तम पुट्टेवार (८२,रा.शुभनगर, मानेवाडा) यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती नोंद करुनच तपास केला, पण चौकशीत हा घातपात असल्याचे उजेडात आले. त्यानंतर याचे धागेदोरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून व गडचिरोली येथील नगररचना विभागात सहायक संचालक पदावर असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यापर्यंत असल्याचे समोर आले. तिने चालक सार्थक बागडे यास सुपारी देऊन सचिन धार्मिक व नीरज उर्फ नाईंटी निमजे या दोघांच्या च्या मदतीने थंड डोक्याने कट रचून सासऱ्यांस संपविल्याचे उघडकीस आले.
अर्चनाचा पती मनीष डॉक्टर असून सासू शकुंतला यांचे ऑपरेशन झाल्याने दवाखान्यात होत्या. पत्नीला भेटून घरी जाताना पुरुषोत्तम यांना कारने धडक देऊन अपघात भासविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.दरम्यान, अर्चना पुट्टेवार ही सध्या पोलीस कोठडीत आहे.