यवतमाळ:- पुसद शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शुक्रवारी (दि.७) रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी आरोपी पतीला वाशिम मार्गावरील एका ढाब्यावरून जेरबंद केले आहे. कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची कबुली पतीने दिली. सपना संजय मोरे (वय २३) असे या मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी पती संजय प्रदीप मोरे (वय २५, रा. निंबी, ता. पुसद) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यातील बोरगडी येथील सपना लक्ष्मण पाईकराव आणि संजय मोरे या दोघांनी ११ मे २०२२ रोजी प्रेमविवाह केला होता. परंतु लग्नानंतर काही महिन्यांनी त्या दोघांत किरकोळ गोष्टींवरून वाद व्हायला सुरूवात झाली. त्यातूनच या दोघांनी घटस्फोट घेण्याचेही ठरविले. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच सपना व संजय हे शुक्रवारी दुपारी शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने व आवाज देऊनही खोलीतून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेलचे मालक देवेंद्र खडसे यांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्याला दिली.
पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून त्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर सपनाचा मृतदेह आढळून आला. मात्र, सपनाबरोबर आलेला तिचा पती संजय मोरे हा हॉटेलमधून पसार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी मृत सपनाचे वडील लक्ष्मण पाईकराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी आरोपी संजय प्रदीप मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धीरज बांडे, पोलिस काॅन्स्टेबल नीलेश उंचेकर, दिनेश सोळंके, मनोज कदम करत आहेत.