मृदा, जलसंधारण विभागातील पदांसाठी फेरपरीक्षा #Mumbai #Maharashtragovernment

Bhairav Diwase
मुंबई:- देशात आणि राज्यात सध्या नीट परीक्षेवरून गोंधळ सुरु आहे. त्यात नेट-यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यात आता राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


मृदा, जलसंधारण विभागातल्या 670 पदांसाठी फेरपरिक्षा घेतली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 14 ते 16 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छ.संभाजीनगर येथील केंद्रांवर गट ब संवर्गातील 670 पदांसाठी ही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.


14, 15 आणि 16 जुलै रोजी ही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण अमरावती येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यावर आता ही फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पाडण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.

…तर कायदेशीर करा, राठोड यांचे निर्देश

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, ही परीक्षा 14,15 आणि 16 जुलै रोजी TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छ.संभाजीनगर येथील केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.