क्षुल्लक कारणावरून चाकूने वार करीत केला दहावीतील विद्यार्थ्याचा खून #murder #nagpur

Bhairav Diwase
नागपूर:- क्षुल्लक भांडणातून दोघांनी दहावीतील विद्यार्थ्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.


पीयुष चक्रधर अतकरी (वय १७, रा. पारडी) असे मृताचे नाव आहे. तो गुमथळा येथे मामाकडे शिकत असून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आई-वडिलांकडे आला होता. पीयुष त्याच्या दोन मित्रांसह पारडी परिसरात असलेल्या शिकवणी वर्गाला मागच्या रस्त्याने जात असताना, गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याला एका मुलगा सातत्याने शिवीगाळ करीत होता.


शनिवारीही (ता. ८) त्याने शिवीगाळ केल्याने पीयुषने त्याला रविवारी पारडीतील लाल शाळेच्या मागच्या मैदानात भेटण्यासाठी बोलाविले. रविवारी (ता. ९) पियुष आणि त्याचे दोन मित्र रात्री साडे आठच्या सुमारास पारडीतील बस स्टॅण्ड जवळील ब्रदर्स नावाच्या सलून मध्ये बसले होते. पीयुषला शिवीगाळ करणाऱ्या युवकाचा इन्स्टाग्रामवरून कॉल आला.


बोलायचे असल्याने शिकवणी वर्गाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर भेटण्यास बोलाविले. पीयुष व त्याचे चार मित्र तिथे गेले. तिथे आरोपी मुलासह त्याचा मित्रासोबत उभा होता. पीयुषने त्याला भांडण करायचे नसून बोलून वाद संपविण्याची मागणी केली. मात्र, आरोपीने शिवीगाळ करून त्याला हातबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पीयुषने त्याला पटकणी देत, खाली पाडले आणि मारू लागला. इतक्यातच त्याच्यामित्राने खिशातून चाकू काढून पीयुषच्या पोटावर, छातीवर आणि हातावर वार करून दोघांनीही पळ काढला. मित्रांनी पियुषला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता.११) सकाळी उपचारादरम्यान पीयुषचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करीत, दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.