चिकन पार्टी करताना वाद; तिघांकडून एकाचा दगडाने ठेचून खून #nagpur #murder

Bhairav Diwase
नागपूर:- सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत बांधकाम मजूरी करणाऱ्या चौघांमध्ये चिकन पार्टीवरून झालेल्या वादात एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.


चिकन शिजवण्याची तयारी सुरू असतांनाच तिघांचा चवथ्या मजूरासोबत वाद झाला. राग अनावर झाल्याने तिघांनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे.लम्बु उर्फ शिवम (३०) असे मृत मजूराचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५) रा. गाव विटाल, तह. राजनांदगाव (छत्तीसगड), अखिलेश धोंडुलाल सहारे (२८) रा. अट्टाकोड, शिवनी, जि. बालाघाट, दिपक असे तिन्ही आरोपींचे नाव आहे.


माहितीनुसार सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत मिहान जवळ सुर्या रेसिडन्सीचे बांधकाम सुरू आहे.याठिकाणी हे मजूर काम करत होते. बांधकामाच्या ठिकाणीच ते चौघेही राहत होते. २० जूनला सुट्टीच्या दिवशी चारही आरोपींनी घरी पार्टी करण्याचे ठरविले. त्यासाठी चिकन, मासोळीची भाजी करण्याचे निश्चित झाले. ही भाजीही आणली गेली. त्यानंतर तिघांनीही मद्यपान केले. त्यानंतर चिकन व मासोळी शिजवण्यावरून तिघांचा चवथ्या लम्बु उर्फ शिवम या मजूराशी वाद झाला.

यादरम्यान इतर तिन्ही आरोपींनी लम्बुच्या तोंडावर दगड मारला. लम्बु रक्ताच्या थारोड्यात पाडल्यावर तिघेही घाबरले. स्थानिक रहिवाश्यांनी लम्बुला जवळच्या अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स)मध्ये दाखल केले.उपचारादरम्यान लम्बुचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदार बळीराम शिवराम मोगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली तर दीपक नावाचा आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.