मुंबई:- महाराष्ट्राबरोबरच देशभरातील तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर ज्या वाघनखांच्या (Wagh Nakh) सहाय्याने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या ऐतिहासिक वाघनखांच्या दर्शनाची आतुरता संपणार आहे. ही वाघनखं पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये आणण्यात येणार आहे.
Also Read:- Sudhir Mungantiwar: शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही याची काळजी घ्या!
3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार
ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून तीन वर्षांनी ती पुन्हा ब्रिटनला पाठवली जाणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शिवरायांची वाघनखं भारतात येतील. जुलैपासून पुढील 10 महिने म्हणजेच 2025 च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनखं या संग्रहालयात दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
ही वाघनखं मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न
शिवकाळातील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. शिवरायांची ही नखं ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ही वाघनखं मायदेशी परत आणण्यासाठी 2023 मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला गेली होती. या टीममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश होता.
कुठे पाहता येणार ही वाघनखं?
अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेली ही वाघनखं राज्यातील 4 संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनखं पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.