चंद्रपूर:- जिल्ह्यातील 137 पोलिस शिपाई पदांकरिता मागील दीड महिने जिल्हा क्रीडा संकुल येथे मैदानी चाचणी पार पडली. यात 19 हजार 760 उमेदवारांपैकी तब्बल एक हजार 321 उमेदवारांनी मैदान गाजवले आहे. या उमेदवारांची आज (दि. 28 जुलै रोजी) स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मैदान गाजविलेल्या या उमेदवारांना परीक्षेत कौशल्य दाखवून मेरिट लिस्टमध्ये यावे लागणार आहे. तेव्हाच त्यांचे खाकी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाईच्या 137 पदांसाठी तब्बल 22 हजार 583 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात 13 हजार 443 पुरुष व 6 हजार 315 महिला व 2 तृतीयपंथी उमेदवार तर बॅण्ड्समनच्या नऊ पदांकरिता दोन हजार 176 पुरुष तर 646 महिला व 1 तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. 19 जूनपासून या भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणीला जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली होती. सुमारे दीड महिने पोलिस शिपाईपदाकरिता चाललेल्या शारीरिक क्षमता चाचणीत अर्ज केलेल्या तब्बल 19 हजार 760 उमेदवारांपैकी 1 हजार 321 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या उमेदवारांची आज (दि. 28 जुलै रोजी) स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागातर्फे परीक्षा केंद्राची पूर्ण तयारी झाली आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली आहे. परीक्षा केंद्रावर पहाटेपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.