Click Here...👇👇👇

तिहेरी प्रेम प्रकरणातील तरुणीचाही अखेर मृत्यू #chandrapur #wardha #murder

Bhairav Diwase
वर्धा:- संशयातून राग अनावर झाल्यास त्याचे पर्यवसान गंभीर घटनेत होत असल्याची प्रकरणे नवी नाहीत. असेच एक प्रकरण वर्धा जिल्ह्यात घडले. यात दोघांचा जीव गेला तर एकास पोलीस कोठडी बघावी लागली. प्रेमाच्या त्रिकोणात झालेल्या हल्ल्यात जखमी युवतीचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणात सावंगी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


२१ जुलै रोजी रविवारी ही घटना घडली होती. ती २२ जुलै रोजी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पूजाचा अखेर मृत्यू झाला. ती सावंगी येथील नर्सिंग महाविद्यालयात एएनएमची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. ती याच परिसरातील ड्रीम लॅन्ड सिटी पार्क येथील एका घरी राहत होती. सोबत तिच्या दोन मैत्रिणी होत्या. पूजाचे तिच्याच गावातील प्रवीण सोनटक्केसोबत प्रेम संबंध होते. मात्र काही दिवसांनी या प्रेमात अंतर पडले होते. त्याचा राग प्रवीणच्या डोक्यात होताच. मात्र पूजाचे मोहित मोहुर्ले या अन्य युवकासोबत पण प्रेमसंबंध असल्याचा संशय प्रवीण यास होता. मोहित हा पूजाच्या आत्याचा मुलगा होय. २१ जुलै रोजी मध्यरात्री पूजाच्या वाढदिवशी प्रवीण चंद्रपूरवरून निघाला. थेट सावंगीत आला. त्याने लगेच पूजाच्या रूमवर धडक दिली. त्या ठिकाणी प्रवीण आढळून आला. मोहित सोबत पूजाचे प्रेमसंबंध असल्याचा प्रवीणचा संशय बळावला. त्याने संतप्त होत हातातील लोखंडी रॉडने मोहितच्या डोक्यात नऊ प्रहार केले. मोहितचा जागीच तडफडून मृत्यू झाला. पूजावर पण प्रवीणणे त्याच लोखंडी रॉडने वार केले. पूजा गंभीर जखमी झाली.

प्रवीण घटनास्थळावरून पसार झाला. दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना पूजाच्या खोलीतून रक्त बाहेर पडत असल्याचे दिसून आले. तेव्हा ही घटना उजेडात आली. त्यानंतर पोलीस तक्रार झाली. पूजास गंभीर अवस्थेत सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या रुग्णालयात तिच्यावर गत पाच दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र अखेर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी प्रवीण खेमराज सोनटक्के यास अटक झाली. त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे हे करीत आहेत. या घटनेने सावंगी येथील वैद्यकीय शिक्षण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.