अमरावती:- महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सिमेवर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर आठजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि.२३) सावलखेडा गावानजीक झाला. जखमींवर खालवा येथे उपचार सुरू आहेत. गुलाबबाई मंगलप्रसाद देवडा, सुंदरबाई हरिराम (वय ४५ ) व छन्नू देवडा (वय ५५, तिघे रा. सावलखेडा) अशी मृतांची नावे आहेत.
अपघातापुर्वी काही लोकांनी ट्रॉलीच्या खाली उडी मारली. त्यामुळे त्यांना किरकोळ इजा झाली आहे. ज्या दोन महिला खाली उतरू शकल्या नाहीत. त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील सर्वजण मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सालीढाणा येथे एका अंत्यसंस्कारासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून ते आपल्या गावी सावलखेडा येथे जात होते. या दरम्यानच हा अपघात झाला. अपघातानंतर आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिक तेथे पोहोचले. त्यांनी बचाव कार्य केले. स्थानिकांनी या अपघाताची माहिती १०८ रुग्णवाहिकेला दिली. त्यामुळे तीन रुग्णवाहिका तेथे पोहोचल्या. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर खंडवा येथे पाठविण्यात आलेले आहे.