चंद्रपूर:- माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र तथा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे दर्शविली आहे.
विशेष म्हणजे राऊत यांनी तशी चाचपणी सुरू केली असून गेल्याच आठवड्यात चंद्रपूर शहरातील कॉग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चर्चा केली आहे. दरम्यान चंद्रपूर विधानसभेसाठी कॉग्रेसच्या यादीत दररोज नविन नावांची भर पडत आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदार संघात कॉग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतल्याने कॉग्रेसकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यातल्या त्यात चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे कॉग्रेस येथे सामाजिक्र व आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे. या यादीत सध्या पहिल्या क्रमांकावर प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांचे नाव आहे.