चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून #chandrapur #gadchiroli #murder

Bhairav Diwase
गडचिरोली:- चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेले अन् पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केला. हत्येनंतर पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या मृतदेहाशेजारी पडून राहिला. ही थरारक घटना बुधवारी (दि. १७) दुपारी अहेरी तालुक्यातील मांड्रा या गावी घडली. रत्ना सदाशिव नैताम (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती सदाशिव लखमा नैताम (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव नैताम हा नेहमी पत्नी रत्नाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. याच कारणावरुन बुधवारी सकाळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेले आणि सदाशिवने रत्नाचे तोंड आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तो तिच्या मृतदेहाशेजारीच पडून राहिला. घटनेच्या वेळी सदाशिवचा १८ वर्षीय मुलगा चिरंजीव हा शेतावर गेला होता. चिरंजीवचा चुलत भाऊ राहुल नैताम याने शेताकडे धूम ठोकून चिरंजीवला बोलावून आणले.

घरी येताच आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बघताच चिरंजीवने हंबरडा फोडला. नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या मदतीने आरोपी सदाशिवला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर दामरंचा येथील पोलिसांनी रत्ना सुरपाम हिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.