गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विभागातील वडलापेठ येथे आज, 17 जुलै रोजी बुधवारी सूरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोलीत येत आहेत.
विदर्भातील औद्योगीक विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण वाटचाल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, 17 जुलै रोजी सूरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. हा महत्वाकांक्षी उपक्रम 10,000 हजार कोटींचा असून या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या 7,000 पेक्षा स्थानिकांना रोजगार निर्माण करणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनूसार आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणि औद्योगीक विकासाला चालना देण्यासाठी, गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे एकात्मिक स्टील प्लाँटची स्थापना करून विकासाच्या दृष्टीकोनात योगदान देत या स्टील प्लाँटची निर्मिती एकूण 350 एकर क्षेत्रात होणार आहे. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.