दहा खांब पाडून केली चोरट्यांनी विद्युत तारांची चोरी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- तालुक्यातील आंबेधानोरा ते सातारा कोमटी शेतशिवारातील शेतकऱ्यांना शेतीपंपाला विद्युत पुरवठा करण्या करीता लघुदाब वाहिनी पुरवण्यात आली आहे.शेतीपंपासाठी उभे केलेले लघुदाबाचे १० विद्युत खांब पाडून ८० किलो विद्युत तारांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.सदर घटना दि.२८ जून शुक्रवारला उघडकीस आली.याबाबत पोंभूर्णा विद्युत विभागाचे तंत्रज्ञ शादाब शेख यांनी दि.२९ जून शनिवारला उमरी पोतदार पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.सदर घटनेमुळे वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे.तसेच शेतकऱ्यांचेही विज खंडित असल्याने मोठे नुकसान झाले आहे.हि घटना पोंभूर्ण्यातील काही नवीन नाही अश्याच प्रकारे मे महिन्यात सुद्धा चोऱ्या झाल्या होत्या.मात्र या चोरींच्या घटनेचा पोलिसांनी अजूनपर्यंत छडा लावला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


आंबेधानोरा ते सातारा कोमटी रोड लगत असलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना शेतीपंपाला विद्युत पुरवठा करण्या करीता लघुदाब वाहिनी पुरवण्यात आली आहे.मात्र आंबेधानोरा ते सातारा कोमटी रस्त्यालगत असलेल्या मैदमवार यांच्या शेतातील डिपीपासून दोन किलोमीटर अंतरावरील उभे करण्यात आलेले १० विद्युत खांब चोरट्यांनी पाडून अंदाजे ८० किलो वजनाचे विद्युत ॲल्युमिनियम तार चोरून नेले.ज्याचे मुल्य एक लाख रुपये इतके आहे.सदर चोरीची घटना दि.२८ जुनला मध्यरात्री नंतर घडली असल्याची माहिती आहे.सदर घटनेत ट्रॅक्टर,जनरेटर इलेक्ट्रिक कटरचे वापर करण्यात आले होते.सदर चोरी करण्यासाठी पन्नासेक माणसांची टोळी असल्याची माहिती आहे.


विद्युत तार चोरीला गेल्याने पोंभूर्णा येथील वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे.शेतपंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतातील सिंचनाची व्यवस्था बंद पडली असल्याने शेतात पीक उभे कसे करावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून युद्धस्तरावर काम सुरू आहे.मात्र ॲल्युमिनियम तार व पोल पोंभूर्णा उपविभागात उपलब्ध नसल्याने दुसऱ्या एजन्सीवर अवलंबून राहावे लागत आहे.त्यामुळे वीज पुरवठा न झाल्यास शेतीपिकाचे नुकसान होईल या विवंचनेत शेतकरी पडला आहे.


पोंभूर्णा विज वितरण शाखेअंतर्गत येणाऱ्या सातारा कोमटी ते आंबेधानोरा शेतशिवारातील २ किमी अंतरावर असलेले १० खांब पाडून ८० किलो एवढी वजनाची ॲल्युमिनियम तार चोरट्यांनी चोरुन नेली आहे.विद्युत खांब व तार याची अंदाजे एक लक्ष रुपयेचे नुकसान झाले असल्याने पोंभूर्णा विद्युत विभागाचे तंत्रज्ञ शादाब शेख यांनी उमरी पोतदार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.