चंद्रपूर जिल्हयात मागील तीन दिवसापासून सर्वत्र सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयातील महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याने जड वाहतुकीसाठी प्रवास बंद करण्यात आला आहे. वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट ह्या वाहणाऱ्या मुख्य नद्या आहेत. मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ह्या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी (दि.21) पूर पाहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हाप्रशासनाने नागरिकांना पूर परिस्थिती पाहण्यासाठी जावून जीव धोक्यात टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी जिल्हयातील चंद्रपूर ते मुल मार्ग, पोंभुर्णा ते मुल मार्ग, गोंडपिपरी ते मुल मार्ग, चंद्रपूर ते गडचांदुर भोयेगांव मार्ग बंद झालेले आहेत. पुरस्थिती निर्माण झालेल्या पुलांवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीकरिता क्रमांक 112 तसेच चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष 07172 - 272480, 251597 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.