राजुरा:- राजुरा तालुक्यात दिनांक 4 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुक्यापासून 6 किमी अंतरावर असलेल्या धोपटाळा येथील नाल्यातून राजुरा येथील येवले नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी होत होती. दरम्यान 3 जुलैच्या मध्यरात्री येवले ह्यांचा ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असताना धोपटाळा येथील काही युवकांनी ट्रॅक्टर अडविला. मजुर व युवकांची बाचाबाची झाली व ह्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन ट्रॅक्टर वर मजुर म्हणून काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. तर दोन मजुर जखमी झाले.
मोहम्मद शहादत खान (52) असे मृतकाचे नाव आहे. जखमींमध्ये ट्रॅक्टर मालक देविदास येवले (47) व मजूर कैलास कुळसंगे (30) यांचा समावेश आहे. तर रोशन बावणे (28) बंडू कुकर्डे (40) हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
घटनेची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठुन प्राथमिक कायदेशीर कारवाई केली व मृत मजुरांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी व जखमी मजुरांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आणले असुन मजुरांच्या माहितीवरून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असुन काही आरोपी फरार असल्याचे कळले आहे. ह्या प्रकरणामुळे कुठलीही अनुचित घटना घडु नये ह्यासाठी दंगा नियंत्रक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात दाखल झाले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.