चंद्रपूर:- चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील सावली येथील बसस्थानक चौकात अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात रविवारी (दि.30) सकाळी साडे दहाच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निळकठं शेडमाके (रा. पेंढरी मक्ता, ता. सावली) असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
रविवारी (दि.30) सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे सिमेंटने भरलेला ट्रक जात होता. या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये शिक्षक निलकंठ शेडमाके दुचाकीवरून जोरात कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर काही लोकांनी जखमी शेडमाके यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. उपचारादरम्यान शेडमाके यांचा मृत्यू झाला. मृत निलकंठ शेडमाके हे सावली तालुक्यातील कढोली येथील आश्रम शाळेत शिक्षक होते. 15 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूकही लढलेली होती. त्यांच्या मृत्यूमुळे सावलीमध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.