राज्यातील कोळसा खाणीकरीता अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यात वाढ करा:- खा. प्रतिभा धानोरकर #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने कोळसा खानी करीता प्रसिध्द असून दिवसेंदिवस कोळसा खानींची संख्या वाढत चालली आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनामार्फत अधिग्रहित केल्या जात असतात. परंतु अधिग्रहित करीत असतांना अत्यल्प मोबदला मिळत असल्याने या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली असून यासंदर्भांत वेकोली चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नागपूर यांना जमिनीच्या मोबदल्यात वाढ करण्याकरीता प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या.

महाराष्ट्र राज्यात नव्याने अनेक कोळसा खानी अस्तित्वात येत आहे. त्याकरीता महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. सद्या अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला अतिशय कमी असून त्यामध्ये वाढ करुन पडीत जमिनीकरीता 20 लाख रुपये प्रति एकर, बिगर सिंचन जमिनीकरीता 22 लाख रुपये प्रति एकर, तर बागायती/सिंचन शेती करीता 24 लाख रुपये प्रति एकर देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर येथे वेकोली चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयात बैठक घेऊन वाढीव मोबदल्या संदर्भात प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठविण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या. मागील 10 ते 12 वर्षांपासून शेतकऱ्यांकडून अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात वाढ करण्यात आली नसून सध्याची महागाई व शेतकरी भुमीहीन होत असतांना त्यांना मिळणारे सद्याचा मोबदला हा अत्यल्प असून यात वाढ करण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर पुढे सरसावल्या आहेत. शेतकऱ्यांकडून अधिग्रहित होणाऱ्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी सरकार कडे देखील प्रयत्न करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. कुठलाही शेतकरी हा सन्मानाने जगावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी नागपूर येथील बैठकीत सांगितले. यावेळी वेकोली चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तथा अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.