शेतात फवारणीसाठी गेलेले 2 भाऊ परतलेच नाही; शोधायला गेलेल्या वडिलांचाही मृत्यू #Washim #death

Bhairav Diwase
वाशीम:- काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात दोन सख्ख्या भावांचा शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता अशीच एक घटना वाशिममध्ये घडली आहे. जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव शिवारातील किसन जीरे यांच्या शेतात फवारणी करण्यास गेलेल्या दोघांचा तसेच त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या एकाचा शेतामधील तुटलेल्या जिवंत विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. अशोक माणिक पवार 38 (वडील) मारोती अशोक पवार 20(मुलगा) आणि दत्ता राजू पवार 18 (पुतण्या) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत.


विजेचा धक्का लागून मृत झालेल्यांमध्ये वडील, मुलगा आणि त्याच्या चुलत भावाचा समावेश आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं पांगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात फवारणीसाठी गेलेला मुलगा आणि पुतण्या शेतामधून घरी आले नसल्यानं वडील त्यांना पाहण्यासाठी शेतामध्ये गेले असता शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मुलांसह वडिलांचाही मृत्यू झाला आहे.


घरातील 2 मुलांना शोधण्यासाठी वडील गेले असता बराच वेळ होऊन हे तिघे ही घरी न आल्यानं ग्रामस्थांनी शेत गाठत त्यांचा शोध घेतला असता त्यांना हे तिघे ही करंट लागून मृत झाल्याचं दिसलं. केवळ महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तिघांचा नाहक बळी गेला असून ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात मोठा रोष दिसत आहे. एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेचा तपास पिंजर पोलीस करत आहेत.