पोलिस भरती! चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे "मायक्रो प्लॅनिंग" #chandrapur #Chandrapurpolice #Spchandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर पोलिस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध केल्याने पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे पोलीस भरतीला येणाऱ्या उमेदवारांकडून कौतुक होत आहे. उमेदवाराच्या अडचणीचे निराकरण हे पोलिस अधीक्षकांनी स्वतः वेळोवेळी केल्याने उमेदवार हि आनंदी होते. भरती प्रक्रियेत पोलिस प्रशासनाला एक वेळ त्रास झाला तरी चालेल पण उमेदवारांना कोणताच त्रास होणार नाही याची दक्षता चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतल्याने शिस्तप्रिय व पारदर्शक नियोजन तसेच उमेदवारांसाठी दिलेल्या सुविधामुळे भरती प्रक्रिया आदर्शवत वाटली हे नक्की.
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली. चंद्रपूर पोलिस दलातील 137 पोलीस शिपाई व 09 बॅण्डस्मनची रिक्त भरती शिपाई प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार भरतीसाठी एकूण 22 हजार 583 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी दि. 19 जूनपासून भरती प्रक्रिया चालू करण्यात आली. ऐन पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात पोलिस भरतीसाठीची मैदानी चाचणी घेतली जात असल्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका झाली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी घेण्यात आली. काही ठिकाणी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या. चंद्रपूरला पण पाऊस झाला. परंतु, चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे शारीरिक मैदानी चाचणीचे नियोजन केल्याने आलेल्या पावसाचा व्यत्यय जाणवला नाही. भरती प्रक्रियेमध्ये चंद्रपूर पोलिसांनी भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळणे आणि पारदर्शकता ठेवणे यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरा आणि इन कॅमेरा याची रेकॉर्डिंग केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या पोलिस भरतीचे "मायक्रो प्लॅनिंग" केले. त्यामुळे पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी आनंद व्यक्त केला आहे.


पोलिस भरतीत घोटाळा व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला. पोलिस भरती प्रक्रीयेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी (RFID) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा ही पारदर्शक आणि अचुक निर्णय घेण्यासाठी मदत झाली. मैदानी चाचणी सुरळीत पार पडावी याकरीता स्वतंत्र रंगाचे कर्तव्य पास पोलिस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आले होते. यामुळे भरती प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यात मदत झाली. भरती प्रक्रीया ही तटस्थपणे, निःपक्षपातीपणे आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होणार नाही याकरीता योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली होती.



पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ओळखी संदर्भात किंवा अन्य प्रकाराचे आमिष दाखवून आर्थिक देवाण घेवाणीचे गैरव्यवहार करुन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांना पत्रव्यवहार करुन त्यांचे पथक संपूर्ण भरती प्रक्रिया कालावधीत उपलब्ध करण्यात आलेले होते. मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस मैदानावर आणू नये, अशी ताकिद पोलिसांकडूनच देण्यात आलेली आहे. असे आढळून आल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा विशेष शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्याद्वारे मैदान व आसपासचे परिसरामध्ये फिरते राहुन सर्व हालचालीवर व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले होते. भरतीच्या मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडिओ शुटिंग द्वारे पारदर्शकपणे ही मैदानी चाचणीची प्रक्रिया पार पडावी म्हणून यासाठी पोलिस प्रशासनाकडून पूर्णतः काळजी घेण्यात आली

पावसाळी वातावरण लक्षात घेता 1600 मीटर, 800 व 100 मीटर तसेच गोळाफेक चाचणी चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडत आहे. सिंथेटिक ट्रॅक असल्यामुळे मैदानी चाचणी पावसाळी वातावरणात घेतांना देखील अडचणी आल्या नाहीत. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना पोलिस दलाकडून राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली यामुळे उमेदवार चाचणी देताना फ्रेश होते हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. पोलिस भरती प्रकियेदरम्यान जिल्हा क्रीडा संकुल परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण होवू नये याकरीता वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला होता याशिवाय वाहतुक नियंत्रण पोलिस व बॅरेकेड्सचा योग्य प्रकारे वापर करण्यात आलेला होता.