मुंबई:- विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकासआघाडीला धोबी पछाड दिली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळे 9 उमेदवार निवडून आले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
Also Read:- पोहण्याचा मोह जीवावर बेतला
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 8 मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या सगळ्या चर्चांवर झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वांद्र्याचे आमदार झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत, त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व आरोपांनंतर झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसबाबत संताप व्यक्त केला आहे.
'मला काँग्रेसच्या कालच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं. विजय वडेट्टीवार असं म्हणत असतील तर त्यांनी माझ्या समोर सांगावं. ज्यांनी असा आरोप केला तेच दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात असतील, म्हणून ते आरोप करत आहेत. मी वांद्र्यातून निवडून येणार, कोणत्या पक्षातून ते वेळ ठरवेल,' असं सूचक विधानही झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे. तसंच मला सगळ्या व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं आहे, अशी खदखदही झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे.