जळगाव:- नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून २५ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. अयोध्या नगर येथील निलेश सुरेश सोनवणे या तरुणाने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह 'पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,' असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे.
पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेला निलेश सोनवणे हा तरुण आई-वडील व मोठ्या भावासह अयोध्यानगरात राहत होता. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. परंतू नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता. मंगळवारी निलेश हा घरी एकटाच होता. त्या वेळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आपण स्वत:च्या इच्छेने जीवन संपवत असून आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही. खूप प्रयत्न करुनही चांगला जॉब लागत नसल्यानं मी टेन्शनमध्ये होतो. खूप डिप्रेशनमध्ये आलो होतो. कुणीही माझ्या परिवाराला आणि इतर कोणालाही त्रास देऊ नये. मी माझ्या इच्छेने जीवन संपवत असल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहिलंय.