मुंबई:- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला. दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली.
विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली होती. पण, सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना सभापतींनी खडेबोल सुनावले. सभागृहामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे. ही कसली संस्कृती आहे. त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजवायला हवे. कारण, अशा वक्तव्यमुळे चुकीचा पायंडा पडेल, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला. अशा प्रकारचे वक्तव्य आणि शिवीगाळ विधिमंडळात करणे अत्यंत चुकीचे आहे असं त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी यापूर्वी कधीही करण्यात आली नव्हती. अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांचा सभागृहात वापर करण्यात आला, असं फडणवीस म्हणाले.
निलम गोऱ्हे म्हणाल्या की, आपण चूक केलं अशा प्रकारची त्यांच्यामध्ये कोणतीही भावना दिसत नाही. माझ्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे. पण, घटनेचा प्रकार क्लेषदायक होता. एका महिला उपासभापतींसमोर नेता असं बोलू लागला, तर प्रत्येकजण असा बोलू लागेल. आम्ही आता अनुभवातून कठोर झालो आहोत, पण दुसऱ्या महिलांचे काय? महिलांना असुरक्षित वाटेल असं काहीही व्हायला नको.