झिम्बाब्वेविरूद्धच्या अखेरच्या ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने दोन मोठे बदल केले. मुकेश कुमार आणि रियान पराग यांना या सामन्यात संधी मिळाली तर ऋतुराज गायकवाडला विश्रांती देण्यात आली.
अखेरच्या ट्वेंंटी-२० सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियाने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना म्हणजे भारतीय संघासाठी केवळ सराव आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर ऐतिहासिक कामगिरी केली.
खरे तर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर १३ धावा करणारा यशस्वी हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हा नो-बॉल असल्याने जैस्वालला फ्री हिटच्या रूपात आयती संधी मिळाली. मग आणखी एक षटकार मारून यशस्वीने एका चेंडूत १३ धावांची नोंद केली.