मंदसौर:- मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) मंदसौर जिल्ह्यात (Mandsaur District) अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आत्महत्येच्या (Suicide) प्रयत्नात आईने विहिरीत उडी घेतल्याने चार मुलांचा बुडून मृत्यू (Death) झाला. मंदसौर जिल्ह्यातील गरोथ येथील पिपलखेडा गावात रविवारी ही धक्कादायक घटना समोर आली.
घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी सुगनाबाई (वय, 40) यांना विहिरीतून वाचवण्यात यश मिळवले. परंतु, त्यांच्या मुलांना वाचवता आले नाही. अरविंद (11), अनुषा (9), बिट्टू (6) आणि कार्तिक (3) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिकांनी नंतर मुंलाचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमलता कुरील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सुगनाचा पती रोडू सिंग याने शनिवारी संध्याकाळी तिला मारहाण केली. पतीने मारहाण केल्यानंतर तिने मुलांसह घर सोडले आणि जवळच्या शाळेत आश्रय घेतला.
रात्र शाळेत राहिल्यानंतर महिलेने आपले आणि मुलांचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास तिने मुलांसह विहिरीत उडी घेतली. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे कुरील यांनी सांगितले आहे.